तापी तीरावरील तत्त्वज्ञ," कै. सावळाराम बाळाजी नाईक."●

"तापी तीरावरील तत्त्वज्ञ,"
कै. सावळाराम बाळाजी नाईक."●
भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेदकालीन व उपनिषद कालीन काळात ज्ञानसाधना करण्यासाठी गुरूंच्या आश्रमात शिक्षण घेण्याची परंपरा होती. ही परंपरा वर्षानुवर्ष पुढे चालत आलेली आहे. कालांतराने शिक्षणाच्या सुविधा वाढल्यात त्यामुळे गुरूंचे आश्रमात राहून शिक्षण घेण्याची प्रथा लोप पावली परंतु, ज्ञानसाधनेत "गुरु- शिष्य" ही परंपरा मात्र अखंडपणे सुरू आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत गुरुभक्तीवर विशेष रचना केली आहे. त्यात गुरुचे महत्व विशद केले आहे. आजवर चालत आलेल्या गुरु- शिष्य परंपरांमध्ये प्रसिद्ध जोड्या वशिष्ठ आणि राम, सांदिपनी - श्रीकृष्ण, रामकृष्ण- विवेकानंद, चाणक्य- चंद्रगुप्त, कृष्ण-अर्जुन, शंकराचार्य- पद्मनाभ, निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर,अशा अनेक आपल्याला माहित आहे आहेत.
गुरु शिष्य परंपरेतून खरे ज्ञान प्रवाहित होते. गुरु आपले तपश्चर्येच्या बळावर मिळालेले, सिद्ध केलेले ज्ञान शिष्याला निर्लेप भावनेने देतो. हे ज्ञान केवळ शब्दातून नाही तर आचरणातून आणि वर्तनातून प्रभावित होत जाते, झिरपत जाते. गुरु केवळ माहिती देत नाही तर ते शिष्याला सर्वतोपरी विकसित करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या व्यक्तिमत्त्वात सद्गुण, संयम, विवेक, ज्ञान आणि सद्भाव जागवतो.
असे उदाहरण आपल्याला आ.सावळाराम बाळाजी नाईक आणि प्रताप शेठ या दोघां गुरू- शिष्यात दिसून येते.
या गुरु शिष्यांच्या कर्तृत्वाने अमळनेर सारख्या आडवाटेच्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. त्याचप्रमाणे अनेकांना या पवित्र मातीत येऊन अभ्यास करण्याची प्रेरणा देखील मिळाली. आ. कै. सावळाराम बाळाजी नाईक व त्यांचे शिष्योत्तम श्रीमंत प्रताप शेठ या दोघांच्या कर्तुत्वाने अमळनेरला शिक्षणाची गंगोत्री सुरू झाली तर तत्त्वज्ञान सारख्या गहन विषयावर जगाला मार्गदर्शन करणारी "तत्त्वज्ञान केंद्र" सारखी संस्था सुमारे 102 वर्षांपूर्वी उभारली गेली. ही संस्था आजतागायत तत्त्वज्ञान या विषयावर अव्याहतपणे कार्यरत आहे.
● आदरणीय गुरुवर्य सावळाराम बाळाजी नाईक यांचे व्यक्तिमत्व●
"गुरु गोविंद ,दोऊ खडे
काके लागु पाव l
बलिहारी गुरू आपनो
जो गोविंद दियो मिलाय,"
असा संत कबीर यांचा प्रसिद्ध दोहा आहे. प्रत्यक्ष परमेश्वर आणि गुरु हे समोर उभे राहिले तर त्यात देखील आधी गुरु ला प्रणाम करावा. कारण गुरु च्या कृपेने परमेश्वराचे दर्शन घडलेले असते. यासाठी गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे.
खान्देशातील चोपडे या गावी राहणारे बाळाजी नाईक हे सावळाराम नाईक यांचे वडील. सावळाराम नाईक यांच्या जन्माबद्दल निश्चित दिनांक उपलब्ध नाही. परंतु पूज्य साने गुरुजी यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात जन्म सन 1865 च्या जून महिन्यात चोपडे येथे झाल्याचे नमूद आहे. बालपणी ते खोडकर आणि उनाड असल्याचे नमूद आहे. पुढे त्यांनी मराठी शाळेत काही काळ शिक्षण घेतले. पुढे वाचनाच्या छंदाने स्वतःच ज्ञान संपादन केल्याचे आढळते. काही मराठी ग्रंथ वाचून व संस्कृत विषय शिकून त्यांनी वेदांत आणि न्याय मीमांसा अशा ग्रंथांचे नीट परिशीलन केले. न्याय मीमांसा, वेदांत शास्त्र या गंभीर विषयाचे त्यांना वेड लागले. त्यात त्यांनी प्रयत्नपूर्वक अध्ययन केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. परंतु त्यांचे वेदांता वरील प्रेम कणभरही कमी झाले नाही. ते वृत्तीने निस्पृह आणि निर्मोही होते. तसेच स्वच्छता, शुचिर्भूतता बद्दल अतिशय आग्रही होते.
त्यांचे संक्षिप्त जीवन चरित्र पूज्य साने गुरुजी यांनी सन 1927 मधे लिहिले आहे. ते चरित्र दि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफी,अमळनेर यांनी प्रसिद्ध केले. सदर चरित्राचे पुनर्मुद्रण आणि दुसरी आवृत्ती नाईक यांच्या नात डॉ. सौ. अनुराधा सुधीर कुलकर्णी, डोंबिवली यांनी 6 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध केलेली आहे.
त्यामुळे या महान विभूतीची माहिती नव्यानेच पिढीला झाली आहे.
त्यांना नाईक मास्तर किंवा गुरुजी म्हणून ओळखले जाई.
नाईक मास्तर हे भारतीय तत्त्वज्ञानाचे निस्सीम उपासक होते. याच ज्ञान मार्गावर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. वेद ,उपनिषदे, षड दर्शने इत्यादी मूळ ग्रंथांवर त्यांची भाषणे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे ग्रंथ देखील त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यासले. या सर्व तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास करताना त्यांची स्वतःची अशी ठाम मते तयार झाली. अहोरात्र विचार मंथन करून चिंतन करून त्यांच्या हाती लागलेले नवनीत त्यांनी जीवापाड जपले. आपल्या शिष्यांना देऊ केले. त्यांना संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे अवगत होती. स्व कष्टाने ते संस्कृत शिकले. आपल्या देशातील तत्त्वज्ञ यांनी इतरत्र असलेल्या विद्वानांचे विचार देखील आवर्जून अभ्यासावेत, स्वतः विचार करून चिंतन करून व्यक्त व्हावे असे त्यांना वाटे .
आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानावर त्यांची जोरकस निष्ठा होती. आणि "ब्रह्म सत्य जग मिथ्या" या सिद्धांतानुसार जग चालते यावर त्यांचा अपार विश्वास होता. जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी त्यात तडजोड केली नाही. शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञाना वरील त्यांची निष्ठा वादातीत होती. शंकराचार्यांबद्दल फार आदर असल्यामुळे अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात शंकराचार्यांची एक सुंदर संगमरवरी मूर्ती असावी असे त्यांना वाटे. त्यांच्या या इच्छेला श्रीमंत प्रताप शेठजींनी पुढे मूर्त रूप देऊन राम मंदिरात शंकराचार्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे.
नाईक मास्तर तत्त्वज्ञानावर सतत चिंतन, विचार विनिमय करत. सिद्धांतांचे खंडन-मंडन करीत. त्यांचा "अहं ब्रह्मास्मि" या सिद्धांतावर अतूट विश्वास होता. गोष्ट मग ती कितीही जुनी आणि आदरणीय असली तरी ती स्वतःच्या अनुभवाच्या कसाला लावून पहिल्या खेरीज मानावयाची नाही असा त्यांचा पूर्ण निश्चय असे. त्यांच्या विचारात खोलपणा आणि सामर्थ्य असे.
त्यांच्या प्रचीतीस आलेल्या गोष्टींपासून ते कणभरही ढळत नसत. त्यांना शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांताचे उपासक मानले जाई. त्यांचे वेदांत विषयक गहन चर्चा असलेले पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी एक संस्था असावी अशा विचाराची पेरणी त्यांनी श्रीमंत प्रताप शेठ यांच्या मनात केली. त्यातूनच 1916 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली
"दि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफी," या संस्थेची स्थापना झाली. त्यावेळी भारतात अशा स्वरूपाची ही एकमेव संस्था होती.
या संस्थेच्या कामासाठी देशभरातील तत्त्वज्ञान
विषयातील विद्वान व्यक्तिचा शोध घेऊन त्यांना नियुक्त करण्यात आले.
फिलॉसॉफी सेंटर च्या उभारणीत, जडणघडणीत त्यांचा सहभाग मोलाचा असे परंतु त्यांची भूमिका नेहमी मार्गदर्शनाची राहिली. या तत्त्वज्ञान केंद्र मार्फत "तत्त्वज्ञान" नावाचे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाई. या त्रैमासिकात तत्त्वज्ञान विषयक लेख ते लिहित. त्यात खंडन-मंडन असे परंतु दुराग्रह नसे.
एकदा टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथावर त्यांनी टीकात्मक लेख लिहिला होता. तेव्हा अमळनेर हायस्कूलचे हेडमास्तर श्री चितळे यांनी मूळ लेखाला उत्तर म्हणून स्वतः लेख लिहून पाठवला. तो लेख छापू नये असे गुरुजींना वाटले. परंतु वाद-विवादानंतर लेख छापण्याची उपयुक्तता त्यांना पटली आणि तो लेख त्रैमासिक मधे प्रसिद्ध झाला. एखाद्या गोष्टीच्या दोन्ही बाजू वाचकांपुढे आल्या पाहिजेत हे संपादनाचे दायित्व त्यांनी उत्तम प्रकारे निभावलेले दिसते.
तत्त्वज्ञान मंदिर या संस्थेचे सूत्र चालकत्व सावळाराम मास्तर यांच्याकडे आमरण होते. या संस्थेतून त्यांनी कुठलाही आर्थिक लाभ घेतला नाही.
●शिष्य श्रीमंत प्रताप शेठ आणि सावळाराम मास्तर पहिली भेट-----●
चोपडा येथे मानकचंद रतिराम शेठ या नावाचे धनाढ्य व्यापारी होते. त्यांना अपत्य नसल्याने त्यांनी मारवाडातील "कालाडेरा" गावातील एक चुणचुणीत मुलगा दत्तक घेतला. या मुलाला शालेय शिक्षण चोपडा येथे सुरू झाले. मुलाला आणखी काही विद्या याव्यात म्हणून संगीताचे शिक्षण देण्यासाठी सतारवादक म्हणून चोपड्या मधीलच सावळा मास्तर यांची नेमणूक करण्यात आली. ते रोज सतार शिकवत.हे शिक्षण चालू असताना मास्तरांच्या मनात आले की, हा मुलगा जात्यात हुशार आहे. याला मराठी आणि इतर ज्ञान दिल्यास याची चांगली प्रगती होईल. म्हणून त्यांनी महत्त्वाची पुस्तके, ग्रंथ आणून त्यांचे शिक्षण त्या मुलाला दिले. तो मुलगा म्हणजे श्रीमंत प्रताप शेठ .यांची आध्यात्मिक बैठक सावळा मास्तर यांनीच घडवली.
त्याबद्दल श्रीमंत प्रताप शेठजी एका ठिकाणी म्हणतात,,,
" तत्त्वज्ञान हा विषय फार गहन आहे. या विषयावरचे शास्त्रीय ग्रंथ मास्तर साहेबांनी आम्हाला फारशी शिकवले नाहीत. फक्त त्यावेळी प्रसिद्ध असलेले भाषांतर रूप असे काही ग्रंथ उदाहरणार्थ धर्म मीमांसा, न्याय मीमांसा, ही पुस्तके आणि अशीच काही पुस्तके आमच्याकडून वाचून घेतली. परंतु मास्तर साहेबांचा शिकवण्याचा मुख्य भर स्वतःला सांगून आम्हाला ऐकविणे यावरच होता. सावळाराम मास्तरांनी गादीवर बसून बोलावे आणि आम्ही सतरंजीवर पालथे पडावे व पडल्या पडल्या सर्वांगाचे कान करून मास्तरांचे तोंडाकडे टक लावून एकाग्र चित्ताने तासंतास त्यांचे बोलणे ऐकत राहावे. असा नित्यक्रम होता .
याशिवाय फिरायला जातांना येतांना रोज याच वेदांताच्या गोष्टीची चर्चा व्हायची. सारांश जेवणाचा व झोपेचा वेळ सोडून बाकी सर्व वेळ मास्तर साहेबांच्या संगतीत वेदांताचे शिक्षण घेण्यातच जात असे. एक-दोन दिवस नाही तर वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत म्हणजे सुमारे 14 वर्षे सतत हा क्रम चालला होता."
शेठजींना तत्त्वज्ञानात गोडी त्यामुळेच उत्पन्न झाली. तो प्रभाव शेठजींच्या जीवनात आणि व्यवहारात आयुष्यभर राहिला त्यातूनच तत्त्वज्ञान विषयक संस्था, शाळा, महाविद्यालय अशा संस्था, हॉस्पिटल, कपडा मिल अशा उद्योग संस्था उभ्या राहिल्या. या संस्था लोकोपयोगी संस्था म्हणून नावारूपाला आल्या. हजारो लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि जीवनाच्या आधार ठरल्या.
सावळाराम मास्तर आणि प्रताप शेठजी यांचे संबंध गुरु-शिष्याहून अधिकचे होते. एकदा अध्यात्म विद्येचे शिक्षण चालू असताना प्रताप शेठ यांनी सावळाराम मास्तरांना म्हटले,,की,
"पुढे केव्हाही मी जरी आपणास सोडले तरी, आपण मला सोडू नये,"
यावर सावळाराम मास्तरांनीही
"बरे ,,नाही सोडणार"
असे म्हटले आणि ,
त्याचप्रमाणे अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत ते प्रताप शेठजी यांचे जवळच अमळनेर येथे येऊन राहिले.
पुढे तत्त्वज्ञान मंदिरात त्यांचे निधन झाले. तो दिनांक होता 22 सप्टेंबर 1924.
त्यांचा branz चा बोलका पुतळा आजही तत्त्वज्ञान केंद्राच्या आवारात दीपस्तंभा सारखा उभा आहे.
"कृष्णदास" नावाच्या कवीच्या ओळी या ठिकाणी कोरलेल्या आहेत. ज्या अतिशय समर्पकपणे सावळाराम मास्तर यांचे व्यक्तित्व आपल्या समोर उभे करतात.
तत्त्वज्ञान-विशारद प्रमुख जो,
ब्रह्मीच जो का स्थित l
वाक पांडित्य ते उगाच जो नच करी,
बोधार्त बोले मित l
साधी सभेची राहणी,परी असे जो का विचारी महा l
नाईक द्विजराज पूज्य श्री सावळाराम हा l
असा हा चोपडाच्या "तापी तीरावरील हा थोर तत्त्वज्ञ" प्रसिद्धी पासून दूर राहिला. आणि निरिच्छ भावनेने अमळनेरच्या बोरी नदीच्या तीरावर कायमचा विसावला . महाराष्ट्रातील या महान तत्त्वज्ञानी विचारवंताच्या कार्याला विनम्रपणे अभिवादन. त्यांच्या विचारांचे पुनः परिशीलन होणे अभ्यास होणे ही देखील त्यांना उचित श्रद्धांजली ठरेल.
सावळाराम मास्तर यांच्या मृत्यूची नोंद अमळनेर नगर परिषदेच्या जन्म मृत्यू रजिस्टरला झालेली आहे. प्रस्तुत लेखकाने ती शोधून काढली आहे.
आज कै.सावळाराम मास्तर यांची आज 102 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना अमळनेरकरांचे वतीने विनम्र अभिवादन ,,,,,,,,
लेखक
-भाऊसाहेब देशमुख,
मुक्त पत्रकार,
अमळनेर
94 20 38 95 41
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...