बहुजन समाजाच्या शिक्षणाचे शिल्पकार - कर्मवीर भाऊराव पाटील पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३९ वी जयंती निमित्त लेख
.jpg)
बहुजन समाजाच्या शिक्षणाचे शिल्पकार - कर्मवीर भाऊराव पाटील
पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३९ वी जयंती निमित्त लेख
भारतातील सर्व राज्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहिला तर महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे येथील बहुजन समाजात शिक्षणाचा झालेला प्रसार. आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, वाड्या-वस्त्यांवर शिक्षणाची गंगा पोहोचली आहे, ती केवळ शासनाच्या धोरणामुळे नव्हे, तर एका महामानवाने पाहिलेल्या स्वप्नामुळे आणि त्या स्वप्नासाठी वाहून घेतलेल्या आयुष्यामुळे. ते महामानव म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांना 'बहुजन समाजाच्या शिक्षणाचे शिल्पकार' असे अग्रक्रमाने संबोधावे लागेल, यात तीळमात्र शंका नाही.
कर्मवीर आण्णांच्या कार्याचे मोल समजून घ्यायचे असेल तर त्यापूर्वीची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा अत्यंत विषमतेने भरलेला होता. शिक्षण हा केवळ मूठभर उच्चवर्णीय, श्रीमंत लोकांचा मक्ता समजला जात होता.
बहुजन समाजाची त्या काळी अवस्था अत्यंत दयनीय होती. आपण शिकावे ही इच्छाच मुळात मनात येत नव्हती. शिक्षणाचे महत्त्वच पटलेले नव्हते. श्रीमंत लोक आपली श्रीमंती शिकू देत नव्हते, म्हणजे आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्याला द्यायचे नाही, ही वृत्ती होती. सामान्य शेतकरी आपल्या शेतातील पिकांच्या गुरमित मश्गूल होता, तर गरीब शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलाला शिक्षणाची इच्छा झाली तरी त्याची परिस्थिती त्याला मजुरीकडे ढकलत होती. पोटाची खळगी भरण्यासाठी शाळा सोडून शेतात राबावे लागत होते.
महात्मा जोतीराव फुले म्हणतात त्याप्रमाणे -
*विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,*
*नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,*
*वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.*
हीच वस्तुस्थिती होती. शिक्षणाच्या अभावामुळे बहुजन समाज शोषणाच्या अंधारात चाचपडत होता. अशी सामाजिक पार्श्वभूमी असताना रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. ही संस्था म्हणजे केवळ शाळा-कॉलेजांचा समूह नव्हता, तर एका विश्व सामाजिक परिस्थितीनेच दिलेली ती ताकद होती. ती ताकद स्विकारणारा महामानवही तेवढाच बलशाली होता.महापुरुष म्हणजेच पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पायगोंडा पाटील उर्फ ती. आण्णा. त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी आजोळी जैन शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. शिक्षणाची कोणतीही परंपरा नाही. स्वतःचे प्राथमिक शिक्षणही अनेक अडचणींनी पूर्ण केले.पण आण्णांच्या मनात एक आग होती. महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांसाठी शिक्षणाचे जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे त्यांनी जाणले होते. शिक्षण हे एक क्रांतीचे, नवसमाजाच्या आत्मविकासाचे आणि विषमतेचा नायनाट करणारे साधन आहे, हे कर्मवीरांनी ओळखले होते.त्यांनी अगदी सुरुवातीला कोल्हापूरच्या जैन बोर्डिंग मध्ये काम केले, सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो, हे त्यांनी स्वतः अनुभवले होते. म्हणूनच त्यांनी ठरवले की, शिक्षण हे फक्त श्रीमंतांसाठी नाही, तर रयतेसाठी, म्हणजे सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी असले पाहिजे.
४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील काले या गावी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. 'रयत' या शब्दातच या संस्थेचे सर्व तत्वज्ञान दडलेले आहे.
'रयत' म्हणजे जनता, बहुजन समाज. अमुक एका जातीचे किंवा अमुक एका धर्माचे वर्चस्व असलेली ही संस्था नाही. जाती-धर्म निरपेक्षता हे तिचे पहिले वैशिष्ट्य. भाऊरावांनी आपल्या स्वतःच्या प्रात्यक्षिक प्रयोगाने महाराष्ट्रालाच काय, पण संपूर्ण देशाला दाखवून दिले की, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.
संस्थेचे ब्रीद होते स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.
समाजातील सर्व वंचितांना शिक्षण मिळावे आणि त्या शिक्षणातून समाज परिवर्तन व्हावे, हा कर्मवीरांचा उद्देश होता. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला. जिथे रस्ता नाही, वीज नाही, अशा दुर्गम भागात त्यांनी शाळा काढल्या. लोकांना पटवून दिले, तुमच्या मुलांना शाळेत पाठवा.
एका बाजूला महात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी लढत होते, तर दुसऱ्या बाजूला कर्मवीर अज्ञानाविरुद्ध लढत होते. दोन्ही लढाया तितक्याच महत्त्वाच्या होत्या.
स्वावलंबी शिक्षणाचा क्रांतिकारी प्रयोग ,कर्मवीर आण्णांचा सर्वात मोठा आणि जगाने आश्चर्याने पाहिलेला प्रयोग म्हणजे 'कमवा आणि शिका' (Earn and Learn) योजना.गरीब मुलाला शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला दोन प्रश्न पडतात .फी साठी पैसा कुठून आणायचा? आणि शिकत असताना पोट कसे भरायचे? कर्मवीरांनी या दोन्ही प्रश्नांवर उत्तर शोधले.
त्यांनी सांगितले - तुम्ही शिका, पण स्वावलंबी बना. शिक्षण घेताना काम करा. त्यांनी वसतिगृहांमध्ये अशी व्यवस्था केली की, विद्यार्थी सकाळी शाळेत शिकतील आणि दुपारी शेतात, बागेत काम करतील. कोणी भाजी पिकवेल, कोणी शेती करेल. त्यातून जो पैसा मिळेल, त्यातून त्यांचे शिक्षण आणि जेवणाचा खर्च भागेल.
स्वावलंबी शिक्षणाचा पाठ देताना मुलांनी कोणतीही कामे करावी यात भेद केला नाही. सर्वांनी पडेल ते काम करावयाचे. हा त्यांचा दंडक होता. मग ते भांडी घासणे असो, स्वयंपाक करणे असो, किंवा खडी फोडणे असो. ते काम करण्यानेच तुमचा विकास साधला जाईल, हा विचार त्यांनी रुजवला. आजच्या 'स्किल इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' चा पाया तेव्हाच रचला गेला होता.
या योजनेमुळे हजारो मुलांना शिक्षण घेणे शक्य झाले, ज्यांनी कधी शाळेचे तोंडही पाहिले नसते. त्यातूनच महाराष्ट्राला अनेक क्षेत्रातील नामवंत तज्ञ, मार्गदर्शक, प्रशासक, राजकीय नेते, शिक्षक मिळाले.जर कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात उभी केली नसती तर काय झाले असते? असा प्रश्न कधी कधी मनात येतो. त्याचे उत्तर इतकेच की, असे घडले असते तर महाराष्ट्र सामाजिक क्षेत्रात स्थिरपणे ठोसपणे उभा राहू शकला नसता.
महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी उचललेले पहिले स्वप्न विसरण गेले असते. समाजातला सामान्य माणूस शिक्षणापासून वंचित राहिला असता.
रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या बहुजनांच्या परिवर्तन चळवळीमध्ये सहभागी होऊन शासनाच्या राज्यकर्त्यांनासुद्धा गुणी विद्यार्थ्यांना जिणे उपलब्ध करून दिलेला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलविण्यास मदत झाली. महाराष्ट्राच्या परिवर्तनात कर्मवीरांचा परिसस्पर्श झाला आणि हजारो लाखो शिक्षित झाले.
आज जेव्हा आपण म्हणतो की महाराष्ट्र पुरोगामी आहे, तर त्या पुरोगामीतेचा पाया कर्मवीरांनी रचला आहे. त्यांनी कधीही जातीचा किंवा गटाचा विचार केला नाही. 'रयत' ने मात्र या गोष्टीला धारा दिलेली नाही. सर्वांसाठी शिक्षण हीच त्यांची भूमिका होती.
आज आपण या विषयाकडे पाहतो, तेव्हा कर्मवीरांचे विचार अधिकच प्रासंगिक वाटतात. आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षण महाग झाले आहे. गरीब मुलांना पुन्हा एकदा शिक्षणापासून वंचित राहावे लागते की काय, अशी भीती वाटते.
अशा वेळी रयत शिक्षण संस्थेचा विचार करता सहज जाणवते की त्या संस्थेवर अमुक जातीचे किंवा अमुक एका गटाचे प्राबल्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण 'रयत' हा विचारच सर्वसमावेशक आहे.
कर्मवीरांनी जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुणी टाका हा विचार कधीही उचलून धरला नाही. गेली शंभर वर्षे समता आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेने केलेले प्रयोग ग्रामीण महाराष्ट्रासाठी बहुजनांच्या विकासासाठी प्रेरक ठरले आहेत.
आज जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण येते, जेव्हा कौशल्याधारित शिक्षणाबद्दल बोलले जाते, तेव्हा कर्मवीर आठवतात. त्यांनी शंभर वर्षांपूर्वी जे करून दाखवले, तेच आज जग स्वीकारत आहे.
समाज सुधारकांना जे कार्य पूर्ण करणे शक्य झाले नाही, ते कर्मवीर आण्णांनी शैक्षणिक प्रसार करून साध्य करून दाखविले. समाजातील सर्व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले.
म्हणूनच जेव्हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी डोंगरी, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला, दुर्गम भागात अनेक शाळा काढल्या म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या विकासाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचा महाराष्ट्राच्या परिवर्तनातील सहभाग याची नोंद करावीच लागेल.
कर्मवीर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते, एक चळवळ होती. ती चळवळ आजही हजारो शिक्षक, लाखो विद्यार्थी आणि कोट्यवधी रयत पुढे चालवत आहेत. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या शिक्षणाचे शिल्पकार आहेत.
लेखक
प्रा.दिलीप आनंदराव जाधव
बळवंत काॅलेज,विटा.
ता. खानापूर,जि.सांगली.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...