जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे दिवसभर विविध मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेत निवेदन देत सविस्तर चर्चा केली. पेन्शनच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या पाठपुराव्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. चर्चेदरम्यान त्यांनी सदर विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांची भेट घेऊन पेन्शन प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
शिक्षण विभागाचे उपसचिव गोविंद कांबळे यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली. त्यांनी पेन्शनविषयक माहिती संकलित करण्यास तात्काळ सुरुवात केली. त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेण्यात आली. त्यांनीही या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
कॅबिनेट बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जुनी पेन्शनच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण भेट
या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांची झालेली भेट. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी आंदोलन स्थगित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर जुनी पेन्शनच्या विषयावर समन्वय संघासोबत स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समन्वय संघाने दिली.
पेन्शनच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यातील आजचा दिवस हा संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. अनेक वर्षांची सेवा, कुटुंबाची जबाबदारी आणि निवृत्तीनंतरच्या सुरक्षित भविष्याची आस मनात घेऊन जुनी पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा या चर्चांकडे लागल्या आहेत.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विशेष सहकार्य
मुख्यमंत्री व विविध मंत्री महोदयांच्या भेटी घडवून आणण्यासाठी कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी सुनील भोर (अहिल्यानगर), सचिन नलवडे (सातारा), सुभाष मोरे (मुंबई), प्रशांत भामरे, भास्कर देशमुख (ठाणे), बाबा पाटील, दत्ता पाटील, इरफान अन्सारी (कोल्हापूर), बंडू मखरे, देवराम दरेकर (अहिल्यानगर) आदी मान्यवरांनी दिवसभर जुनी पेन्शनच्या प्रश्नासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
“एकच मिशन — जुनी पेन्शन!”
या निर्धारासह पुढील बैठकीकडे राज्यातील पेन्शनधारक व कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...
पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशि...