राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
.jpg)
अमळनेर प्रतिनिधी
: जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अमळनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अमळनेर येथील रोटरी क्लब हॉल, पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सौ. कविता सुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी गणित-विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, पालक तसेच विज्ञान क्षेत्रातील शिक्षक उपस्थित होते.
अमळनेर तालुक्यातील आठ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेत विविध विज्ञान संकल्पना नाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केल्या. ज्येष्ठ विज्ञान शिक्षक भाऊसाहेब देशमुख व दिनेश नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, जिज्ञासा, आकर्षण आणि संशोधनवृत्ती निर्माण करणे हा या नाट्योत्सवामागील मुख्य उद्देश होता.
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, सादरीकरण आणि विज्ञानविषयक आशयाच्या उत्कृष्ट मांडणीच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला. विज्ञान शिक्षिका स्वाती माळी यांनी विद्यार्थ्यांना नाट्य सादरीकरण, अभिनयातील बारकावे आणि विज्ञानविषयक मार्गदर्शन केले.
विजयी संघात दिक्षिता भामरे, स्वरा कासार, विधी पाटील, परिणीती शिंदे, कुणाल बोरसे, प्रणाली सैंदाणे, पुष्करा राजपूत, मयंक राजपूत व आरुषी महाजन यांनी भूमिका साकारल्या.
या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, तसेच डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, श्रावण पाटील, व्ही. पी. बडवे यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
तालुकास्तरीय यशानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ सज्ज झाला आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

कमेंट्स (0)