'पेन्शन आमचा हक्क; आता शेवटपर्यंत संघर्ष!’ , अमळनेरमध्ये पेन्शनपीडितांची सहविचार सभा; ‘आझाद मैदानावरील लढाईत पूर्ण ताकदीने उतरा’ — डॉ. शांताराम पाटील

‘पेन्शन आमचा हक्क; आता शेवटपर्यंत संघर्ष!’
अमळनेरमध्ये पेन्शनपीडितांची सहविचार सभा; ‘आझाद मैदानावरील लढाईत पूर्ण ताकदीने उतरा’ — डॉ. शांताराम पाटील
अमळनेर प्रतिनिधी :
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले तसेच टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यातील पेन्शनपीडित कर्मचारी आपल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय जनजागृती सुरू आहे.
याच अनुषंगाने अमळनेर येथील मुंदडा माध्यमिक विद्यालयात सायंकाळी ५ वाजता अमळनेर तालुक्यातील पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांची सहविचार सभा पार पडली. जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. शांताराम पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आंदोलनाची दिशा आणि पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. शांताराम पाटील यांचा शाल-बुके देऊन सत्कार
सभेच्या प्रारंभी अमळनेर तालुका जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास पाटील तसेच व्यासपीठावरील मुख्याध्यापकांनी डॉ. शांताराम पाटील यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला.
व्यासपीठावर जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, मुख्याध्यापक प्रभाकर विंचुरकर, अनिल महाजन, एम.ए. पाटील, एन.एल. पाटील, दिनेश पाटील, जे.एन. पाटील, डी.एम. पाटील, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभुदास पाटील तसेच माध्यमिक शिक्षक संघाचे अमळनेर अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ यांची समर्थनाची पत्रे सुपूर्द
यावेळी आमदार अनिल दादा पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांनी जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा दर्शविल्याची पत्रे जुनी पेन्शन संघटनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शांताराम पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
‘शेवटच्या आंदोलनात सक्रिय सहभाग द्या’
माध्यमिक शिक्षक संघाचे अमळनेर तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी जुन्या पेन्शनचा प्रश्न हा कर्मचाऱ्यांच्या हक्काशी संबंधित असल्याचे सांगत आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पेन्शनचा अध्यादेश निघेपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलनात सहभागी राहण्याची भूमिका त्यांनी मांडली.
‘सेवानिवृत्तीनंतरही काम शोधण्याची वेळ’ — नंदा पाटील
श्रीमती नंदा पाटील यांनी पेन्शनअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार बंद झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण, विवाह, आजारपण यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळताना सेवानिवृत्तीनंतरही काम शोधण्याची वेळ काही कर्मचाऱ्यांवर आल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी २८ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘अन्यायाविरोधात एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही’
२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांबाबत शासनाने अन्याय केल्याची भावना व्यक्त करत उपस्थित वक्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनाला बळ देण्याचे आवाहन केले. आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी करून शासनाकडून अध्यादेश काढला जाईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
‘फक्त फोटो काढण्यासाठी आझाद मैदानावर येऊ नका!’
सभेतील मार्गदर्शनादरम्यान जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. शांताराम पाटील यांनी आंदोलनाबाबत आक्रमक भूमिका मांडली.
ते म्हणाले, “शिक्षक हा पेन्शनपीडित आहे. नियुक्ती २००५ पूर्वीची आहे; मात्र २००५ नंतर पेन्शन बंद करण्यात आली. आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती; मात्र शासनाने विश्वासघात केल्याची आमची भावना आहे. शिक्षणसेवकांना पेन्शन देण्यात आली आहे. आता ही शेवटची लढाई आहे.”
पुढे ते म्हणाले, “जे घरी आहेत त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. फक्त फोटो काढण्यासाठी आझाद मैदानावर येऊ नका. ही पेन्शनची शेवटची लढाई आणि आपल्या हक्काची लढाई आहे. आता सर्व सोडून २८ सप्टेंबरला आझाद मैदानावर या.”
तसेच, २८८ आमदारांची समर्थनाची पत्रे घेऊन त्यांना आझाद मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणावे, आपल्या तालुक्यातील आमदारांची भेट घेऊन पेन्शनचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडावा, असे आवाहन त्यांनी केले.
“आपण आक्रमक व्हायला हवे. शंभर टक्के उपस्थिती महत्त्वाची आहे. त्याग करावा लागेल. ही शेवटची संधी आहे,” असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग
या सहविचार सभेला अमळनेर तालुक्यातील पेन्शनपीडित कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी आझाद मैदान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील यांनी केले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...