मुक्ताई ही महिलांची चळवळ जागतिक चळवळ बनली पाहिजे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांचे प्रतिपादन, मुक्ताई सेवादूत च्या सेवाभावी उपक्रमाची जलोषात सुरुवात

मुंबई : मुक्ताईच्या माध्यमातून सुरू झालेली आई आणि मातृत्वाची चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर आणि जगभर पोहोचली पाहिजे. आई आणि मातृत्वाच्या भावनेभोवती निर्माण झालेली मोठी दरी आणि विस्कटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी ही चळवळ व्यापक आणि जागतिक स्वरूपाची झाली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व सिनेकलाकार वर्षा उसगावकर यांनी केले.
विलेपार्ले येथे मुक्ताई सेवादल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण कॅडर कॅम्पमध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी मुक्ताई सेवादल फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा सारिका पन्हालकर-महोत्रा, सारिका काळे, आणि निधी डोगरा, मोसमी ठाकूर, एड. भक्ती जोगल आणि रश्मी मारवाडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मातृत्व आणि आई या मूल्यांची चळवळ महाराष्ट्रातून देशभर आणि पुढे जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने मुक्ताई सेवादल फाउंडेशनने जिल्हानिहाय संघटनात्मक नेटवर्क अधिक सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात या चळवळीचे काम सातत्याने आणि पूर्णवेळ पुढे नेण्यासाठी जिल्हा समन्वयक महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वविकासासाठी आणि कार्यपद्धतीसाठी मुंबईतील विलेपार्ले येथील मुक्ताई व ड्रीमर सोल्यूशनच्या कार्यालयात या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वर्षा उजगावकर यांनी आपल्या भाषणातून आई आणि मातृत्वाची चळवळ आजच्या काळात का आवश्यक आहे, यावर विविध भावनिक आणि सामाजिक उदाहरणांसह प्रकाश टाकला. चित्रपटांमध्ये साकारली जाणारी आई आणि प्रत्यक्ष आयुष्यातील आई यामध्ये असलेला फरक, आईकडून कुटुंब आणि समाजाच्या असलेल्या अपेक्षा, तिच्यावर टाकला जाणारा भावनिक व सामाजिक भार आणि मातृत्वाकडे पाहण्याची बदलती दृष्टी यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
“आई ही केवळ एका नात्याची ओळख नाही, तर ती संस्कार, माणुसकी आणि संवेदनशीलतेची पहिली शाळा आहे. त्यामुळे आई आणि मातृत्वाचा सन्मान हा केवळ भावनेचा विषय न राहता तो समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग झाला पाहिजे,” अशा आशयातून त्यांनी मुक्ताईच्या व्यापक कार्याची गरज अधोरेखित केली.
या प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना नेतृत्वविकास, संघटनात्मक बांधणी, सामाजिक संवाद, चळवळीचा विस्तार आणि जिल्हास्तरावर कामाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांना चळवळीच्या उद्दिष्टांप्रती निष्ठेने आणि जबाबदारीने काम करण्याची शपथही देण्यात आली.
दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर या महिला आपल्या-आपल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मुक्ताईच्या माध्यमातून आई आणि मातृत्वाची संकल्पना समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम करणार आहेत.
मुक्ताई सेवादल फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा सारिका पन्हाळकर-महोत्रा म्हणाल्या की, आई आणि मातृत्वाची चळवळ ही आजच्या काळाची गरज बनली आहे. या चळवळीला केवळ भावनिक स्वरूप न देता तिला सशक्त, संघटित आणि नेतृत्वक्षम बनविण्यासाठी मिशनच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या महिला जिल्हा समन्वयकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या समन्वयकांच्या माध्यमातून मुक्ताईचा अजेंडा प्रभावीपणे जिल्ह्यापर्यंत पोहोचेल आणि आई, मातृत्व, माणुसकी, संस्कार व सन्मान ही मूल्ये जनमानसात सातत्याने रुजविण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुक्ताईच्या माध्यमातून तयार होत असलेले हे महिला नेटवर्क आगामी काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, त्यानंतर देशातील विविध भागांत आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे मुक्ताई ही केवळ एक संस्था न राहता आई, मातृत्व, माणुसकी, संस्कार आणि सन्मान यांना केंद्रस्थानी ठेवणारी व्यापक सामाजिक चळवळ म्हणून उभी राहण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल या प्रशिक्षणातून पडले.
——
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...