विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पालकांचे मंथन; विक्रमी उपस्थितीत शिक्षक-पालक सभा

धरणगाव शहर प्रतिनिधी (किरण चव्हाण)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शिस्त, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालकांमध्ये मुक्त संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक-पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात झालेल्या या सभेला विक्रमी संख्येने पालकांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे सचिव व आदर्श माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सी.के. पाटील, पत्रकार अविनाश बाविस्कर, पंढरीनाथ पाटील, छाया बिऱ्हाडे, गणेश झुंझारराव, सरला पाटील, प्रा. आर.एन. भदाणे व उपप्राचार्य ए.एस. पाटील उपस्थित होते. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी सभेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, मोबाईलचा वापर, अभ्यासाच्या सवयी, विद्यालयात ये-जा करताना निर्माण होणाऱ्या अडचणी, विद्यार्थी सुरक्षा तसेच प्रवासाच्या समस्यांबाबत मनमोकळेपणाने प्रश्न व सूचना मांडल्या.
पर्यवेक्षिका भारती पाटील व ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पालकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर सचिव सी.के. पाटील यांनी सविस्तर संवाद साधत शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांच्या हिताशी निगडित प्रश्न गांभीर्याने घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अध्यक्षीय मनोगतात सुरेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांनी विद्यालयाच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पालकांनी आपल्या मनातील प्रश्न, समस्या व सूचना खुलेपणाने मांडल्याने सभा आपुलकी, विश्वास आणि संवादाच्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे विचारमंथन केल्याने ही सभा विशेष ठरली.
सूत्रसंचालन आरती जैन यांनी केले, तर आभार बाबाजी मासूळ यांनी मानले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधि...
माहिती अधिकार दिनानिमित्त महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजागृ...
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची अंमळ...
“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा म...